Azadi ka Amrit Mahatsav

प्रधान मंत्री जन-धन योजना (पीएमजेडीवाय) बद्दल विचारले जाणारे सामान्य प्रश्न

प्रधान मंत्री जन-धन योजना (पीएमजेडीवाय) म्हणजे काय?

प्रधानमंत्री जन-धन योजना (पीएमजेडीवाय) ही ज्या प्रौढ व्यक्तींचे बँकेत व्यवहार नाहीत (अनबँक्ड) त्यांना सार्वत्रिक बँकिंग सेवा पुरविण्यासाठी भारत सरकारने ऑगस्ट २०१४मध्ये सुरू केलेली राष्ट्रीय आर्थिक समावेशन मोहीम (एनएमएफआय) आहे.

पीएमजेडीवाय अंतर्गत कोणते फायदे मिळतात?

पीएमजेडीवाय अंतर्गत पुढील फायदे उपलब्ध असतात:

 • बँकेत खाते नसलेल्या व्यक्तीसाठी एक आधारभूत बचत खाते उघडले जाते.
 • पीएमजेडीवाय खात्यात कोणतीही किमान शिल्लक रक्कम ठेवण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे पीएमजेडीवाय खाती शू्न्य शिलकीसह उघडली जाऊ शकतात.
 • पीएमजेडीवाय खात्यात ठेवलेल्या रकमेवर व्याज प्राप्त केले जाते.
 • पीएमजेडीवाय खातेधारकास रूपे डेबिट कार्ड दिले जाते.
 • पीएमजेडीवाय खातेधारकास देण्यात येणाऱ्या रूपेकार्डवर १ लाख रुपयांचे अपघाती विमा संरक्षण (२८.८.२०१८ नंतर उघडलेल्या नवीन पीएमजेडीवाय खात्यांसाठी २ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहे) उपलब्ध आहे.
 • १५.८.२०१४ ते ३१.१.२०१५ दरम्यान प्रथमच खाते उघडलेल्या पात्र पीएमजेडीवाय खातेदारांना 30000 रुपयांचे जीवन विमा संरक्षण उपलब्ध आहे.
 • पात्र खातेधारकांना १०,००० रुपयांपर्यंतची ओव्हरड्राफ्ट (ओडी) सुविधा उपलब्ध आहे.

पीएमजेडीवाय खाती कुठे उघडली जाऊ शकतात?

कोणत्याही बँकेच्या शाखेत किंवा बिझिनेस करस्पाँडंट्‌स किओस्क्समध्ये पीएमजेडीवाय खाती उघडली जाऊ शकतात.

बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट अकाऊंट (बीएसबीडीए) म्हणजे काय?

पीएमजेडीवाय खाती ही काही अतिरिक्त सुविधांसह बीएसबीडीए असतात. बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट (बीएसबीडी) खाते हे बचत खाते असते, ज्यातून कोणतीही किमान शिल्लक रक्कम ठेवण्याची आवश्यकता नसून पुढील किमान सुविधा निशुल्क मिळतात.

 1. रोख रक्कम ठेवणे
 2. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक चॅनेलच्या माध्यमातून पैसे प्राप्त करणे/जमा करणे किंवा केंद्र/राज्य सरकारच्या संस्थांकडून आणि विभागांकडून देण्यात आलेले चेक जमा/गोळा करणे.
 3. एका महिन्यात किती वेळा आणि किती पैसे जमा करावेत यावर कोणतीही मर्यादा नाही.
 4. महिन्यातून किमान चार वेळा पैसे काढणे, ज्यात एटीएममधून काढलेल्या पैशांचाही समावेश आहे.
 5. एटीएम कार्ड किंवा एटीएम-कम-डेबिट कार्ड

याव्यतिरिक्त, बीएसबीडी खात्यांसाठी ग्राहकाने वर उल्लेख केलेल्या किमान सेवांच्या व्यतिरिक्त मागणी केलेल्या चेकबुक देण्यासारख्या मोफत किंवा सशुल्क सुविधा त्यांची माहिती उघड करण्याच्या/ न करण्याच्या अटीवर देण्यास, बँका स्वतंत्र आहेत. अशा अतिरिक्त सुविधा सुरू करण्यासाठी अशा खात्यांमध्ये किमान रक्कम शिल्लक असण्याची आवश्यकता नाही.

पीएमजेडीवाय अंतर्गत एकापेक्षा अधिक खाती उघडता येऊ शकतात का?

आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार:

 • बीएसबीडी खातेधारक त्या बँकेत इतर बचत बँक खाते उघडण्यास पात्र नाहीत जर ग्राहकाचे त्या बँकेत इतर बचत खाते असेल, तर त्याने/तिने ते बीएसबीडी खाते उघडल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत बंद केले पाहिजे.
 • बीएसबीडी खाते उघडण्यापूर्वी बँकेने ग्राहकाकडून असे घोषणापत्र घेतले पाहिजे की, त्याचे/तिचे इतर कोणत्याही बँकेत बीएसबीडी खाते नाही.

पीएमजेडीवाय खाती ही बीएसबीडी खात्यांसारखीच असतात का?

पीएमजेडीवाय खात्यांचे स्वरूप हे बीएसबीडी खात्यांसारखेच असते, ज्यांमध्ये अपघात विमा संरक्षण आणि ओव्हरड्राफ्टसारख्या अतिरिक्त रुपे डेबिट कार्ड सुविधा असतात.

प्रधान मंत्री जन-धन योजना खाते (पीएमजेडीवाय) काढण्यासाठी मला कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?

पीएमजेडीवाय खाते उघडण्यासाठी आपल्याला बँकेच्या शाखेत/बिझिनेस करस्पाँडंटकडे आवश्यक ती केवायसी कागदपत्रे वैयक्तिक सादर करावी लागतात.

स्मॉल अकाऊंटवर कोणत्या मर्यादा आहेत?

स्मॉल अकाऊंट्‌सला पुढील मर्यादा असतात:

 • सर्व खात्यांचा मिळून पतपुरवठा एका आर्थिक वर्षात १ लाख रुपयांपेक्षा अधिक नसतो.
 • स्मॉल खात्यातील सर्व मिळून काढलेले पैसे आणि हस्तांतरित केलेली रक्कम ही एका महिन्यात १०,००० रुपयांपेक्षा जास्त असू शकत नाही.
 • स्मॉल खात्यातील शिल्लक रक्कम कोणत्याही वेळी ५०,००० रुपयांपेक्षा अधिक असू शकत नाही.

मी स्मॉल अकाऊंट हे पीएमजेडीवाय अंतर्गतच्या नियमित बीएसबीडी खात्यात कसे रूपांतरित करू शकेन?

जर एखाद्या ग्राहकाला त्याचे/तिचे स्मॉल अकाऊंट पीएमजेडीवाय अंतर्गतच्या नेहमीच्या बीएसबीडी खात्यात रूपांतरित करावयाचे असेल तर त्याने/तिने बँकेकडे तुमच्या ग्राहकाला जाणून घ्या (केवायसी) यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांसह विनंती केली पाहिजे.

मी माझ्या पीएमजेडीवाय खात्यासाठी चेक बुक सेवा प्राप्त करू शकेन का?

पीएमजेडीवाय खातेधारकांसाठी चेक बुक सुविधा अनिवार्य मोफत सुविधा नाही. परंतु बँका चेक बुक देण्यासारख्या अतिरिक्त सेवा देण्यास मुक्त आहेत, ज्यांच्यासाठी आकार कापला जाईल किंवा जाणार नाही. परंतु चेक बुकची सुविधा देण्यासाठी बँका पीएमजेडीवाय खात्यांमध्ये किमान शिल्लक रक्कम ठेवण्याची अट घालू शकत नाहीत. आमच्या बँकेत आम्ही १० चेक असलेले चेक बुक किमान शिल्लक रकमेचा आग्रह न धरता मोफत देतो. अशा अतिरिक्त सेवा दिल्यामुळे, जोपर्यंत निर्धारित किमान सेवा मोफत पुरविल्या जातात, तोपर्यंत हे खाते बिगर-बीएसबीडी खाते होणार नाही.

मी माझा मोबाईल क्रमांक माझ्या बँक खात्याशी कसा जोडू शकेन?

ग्राहकाने विनंती केल्यास/माहिती दिल्यास त्याचा/तिचा मोबाईल क्रमांक बँक त्याच्या खात्याशी जोडते.

रूपे डेबिट कार्ड म्हणजे काय?

रूपे डेबिट कार्ड हे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) यांनी सुरू केलेले एक भारतीय देशांतर्गत डेबिट कार्ड आहे. हे कार्ड एटीएम, मायक्रो एटीएम, पीओएस, एमपीओएस मशीन्स, ऑनलाईन ट्रँझॅक्शन्स, इत्यादींसाठी स्वीकारले जाते.

रूपे डेबिट कार्डसाठी कोणता पिन असतो?

वैयक्तिक ओळख क्रमांक (पिन) हा एटीएममधून पैसे काढताना आणि पॉईंट ऑफ सेल (पीओएस) मशीन्स किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पेमेंट करताना डेबिट कार्ड वापरण्यासाठी एक गोपनीय क्रमांक असतो. हा पिन गोपनीय असतो आणि तो कोणालाही सांगायचा नसतो.

मी माझे रूपे कार्ड सुरक्षित कसे ठेवू शकेन?

रूपे कार्डच्या लाभधारकाने खालील गोष्टींची खातरजमा करणे आवश्यक आहे:

 1. कार्ड हे सुरक्षितपणे सांभाळून ठेवले पाहिजे.
 2. ग्राहकांना कार्ड देताना बँकेकडून स्वतंत्रपणे टपालाद्वारे पाठवलेला/हाती दिलेला रूपे कार्डचा पिन कोणालाही सांगता कामा नये.
 3. बँकेचे कर्मचारी/बँक मित्र यांच्यासह बँक कधीही हा पिन कोणालाही सांगण्यास सांगत नाही, अगदी फोनवरसुद्धा नाही.
 4. ग्राहकांनी ठरावीक कालावधीनंतर हा पिन बदलीत रहावे.
 5. पिन कधीही कार्डवर लिहू नये.

पीएमजेडीवाय खातेधारकांना रूपे कार्डसोबत मिळणारे अपघात विम्याचे संरक्षण प्राप्त करण्यासाठी पात्रतेचे कोणते निकष आहेत?

एनपीसीआयच्या रूपे इन्शुरन्स प्रोग्रॅम २०१९-२० अनुसार रूपे कार्ड धारण करणाऱ्या, बँकेची शाखा/एटीएम/मायक्रो एटीएम/पीओएस/ई-कॉम/बँक मित्र यांसारख्या काणत्याही पेमेंट इन्स्ट्रुमेंटद्वारे किमान एक यशस्वी ट्रँझॅक्शन (आर्थिक किंवा बिगर-आर्थिक), अपघाताच्या तारखेसह अपघाताच्या तारखेच्या ९० दिवस आधी करणारे पीएमजेडीवाय खातेधारक यासाठी पात्र असतात. रूपे पीएमजेडीवाय कार्डसाठी विम्याचा दावा करण्याकरिता वयाचा निकष हा ५ वर्षे आणि त्यावर असा आहे.

दाव्यासाठी दस्तऐवज सादर करण्याचा कालावधी किती आहे?

दाव्यासाठी पुराव्यादाखल असलेली सर्व कागदपत्रे दाव्याची माहिती दिल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत सादर केलीच पाहिजेत.

मी रूपे कार्ड अपघाती विम्याअंतर्गतचा दावा कसा करू शकेन?

दावा हा दाव्यासाठीचा अर्ज भरून व त्यासोबत दाव्यासाठीची कागदपत्रे, रूपे कार्डधारकाचे खाते बँकेच्या ज्या शाखेत आहे, तेथे सादर करावयाची असतात.

अपघात विमा पॉलिसीमध्ये नैसर्गिक मृत्यू, आत्महत्या किंवा कोणत्याही आजारामुळे/रोगामुळे/गरोदरपणामुळे आलेला मृत्यू यांचाही समावेश आहे का?

नाही, अपघात विमा पॉलिसीमध्ये फक्त अपघातामुळे झालेल्या इजांमुळे, जी अनैच्छिक असेल किंवा स्वत: करवून घेतलेली नसेल, त्यामुळे होणारा मृत्यू ह्याचा समावेश आहे.

पीएमजेडीवाय खातेधारकांसाठी रूपे कार्ड इन्शुरन्स पॉलिसीमध्ये दाव्याची रक्कम मिळण्यासाठी किती कालावधी लागतो?

कागदपत्रांच्या संपूर्ण संचासह दावा प्राप्त झाल्यानंतर आणि विमा कंपनीने त्याचे मूल्यमापन केल्यानंतर तो १० दिवसांच्या आत निकाली काढण्याची आवश्यकता असते.

पीएमजेडीवाय खातेधारकांना कोणती समस्या आल्यास त्यांनी कोणाशी संपर्क साधावा?

पीएमजेडीवाय खात्याशी संबंधित शंका असल्यास खालील ठिकाणी संपर्क साधता येईल:

 1. बँकनिहाय तक्रारींशी संबंधित तपशील येथे उपलब्ध आहेत:​: https://pmjdy.gov.in/PMJDYGrievance/SecurePages/User_login.aspx
 2. पुढील संकेतस्थळावर पीएमजेडीवायशी संबंधित तक्रारी नोंदवल्या जाऊ शकतात: https://pmjdy.gov.in/PMJDYGrievance/user_feedback.aspx